विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आणि अनिवार्य भाग आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अभ्यास करताना विद्यार्थी आणि पालकसुद्धा अनेक चुका करतात. या चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो आणि त्यांच्या मार्क्सवर सुद्धा…
आजच्या लेखात आपण हेच पाहणार आहोत की नेमक्या पालकांकडून काय चुका होतात ज्याने विद्यार्थी अभ्यासात मागे पडतो.
1) शिक्षकांचा सल्ला न घेणे
अनेक पालक असे असतात जे आपल्या मुलाचे किंवा मुलीचे ऍडमिशन शाळेत घेतात आणि आपली जबाबदारी संपली असे समजून पुन्हा शाळेचे तोंडही पाहत नाहीत. सर्व जबाबदारी शाळेतील शिक्षकांवर सोडवून मोकळे होतात. पालकांनो जागे व्हा आपल्या मुलांच्या शाळेत जा आणि आपल्या मुलांना काय येते आणि काय नाही हे शिक्षकांना विचारा. त्यांचा सल्ला घ्या.
2) विद्यार्थ्यांसाठी वेळ न देणे
अनेक पालक आपल्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना आपल्या मुलांसाठी अजिबात वेळ नसतो. ते फक्त चालता चालता आढावा घेतात की मुलांनी अभ्यास केला की नाही. आणि याचाच फायदा विद्यार्थी घेतात. मुले फक्त असे दाखवितात की आम्ही अभ्यास केला आहे पण प्रत्यक्षात त्यांना काही येते की नाही हे पालकांनी वेळ काढून तपासायला हवे.
3) मुले म्हणतील तसेच करने
अनेक पालक असे असतात की आपली मुले म्हणतील तेच खरे… खूप जास्त विश्वास टाकतात पालक विद्यार्थ्यांवर. आणि नंतर पदरी पडते ती निराशा… पालकांनो विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष द्या. तुम्हाला त्यांच्या अभ्यासातील काही येत नसेल तरी चालेल पण ते अभ्यास करीत असताना अर्धा तास तरी त्यांच्या जवळ बसा. आणि विद्यार्थी कसा अभ्यास करतात हे तपासा. त्याने विद्यार्थ्यांना जाणीव होते की आपल्या पालकांचे आपल्यावर लक्ष आहे.
4) विद्यार्थ्यांचे मत विचारात न घेणे
काही पालक असे असतात जे विद्यार्थ्यांचे मत अजिबात विचारात घेत नाहीत. आम्ही म्हणू तसेच तू करायचे असे म्हणतात. प्रमाणापेक्षा जास्त अभ्यास मुलांवर लादतात. पालकांनो विद्यार्थ्यांची आवड निवड लक्षात घ्या. त्यांना थोडे समजावून घ्या. विद्यार्थ्यांना एखादा विषय अवघड जात असेल तर तो त्यांच्यावर बळजबरीने लादू नका… शाळेत जाऊन संबंधित विषयाच्या शिक्षकांना जाऊन भेटा आणि शिक्षकांच्या सल्ल्याने त्यावर मार्ग काढा.
5) विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे
पालकांना वेळ नसतो म्हणून ते विद्यार्थ्यांच्या चूकांकडे लक्षच देत नाहीत किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम विद्यार्थी त्याच चुका पुन्हा पुन्हा करतो आणि विद्यार्थ्यांची प्रगती होत नाही. आपली मुले अभ्यासात कुठे चुका करतात ते लक्षात घ्या त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मुलांकडे आणि त्यांच्या अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
पालकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा खूप वाढली आहे. आणि या स्पर्धेत आपला विद्यार्थी टिकून रहावा असे जर पालकांना वाटत असेल तर पालकांनी जागरूक असणे खूप गरजेचे आहे. पालकांनो विद्यार्थ्यांसाठी वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांना शिक्षकांच्या मदतीने योग्य मार्गदर्शन करा. तरच आपली मुले प्रगतीच्या मार्गावर टिकून राहतील…
– विकास भारत कोटकर.
अशीच शैक्षणिक माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.