आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला भरपूर ज्ञान आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ही न ऐकलेली गोष्ट आपल्याला माहिती आहे का ?
अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी इतिहासात दिल्या गेलेल्या आहेत परंतु या गोष्टीचा उल्लेख इतिहासात आहे की नाही हे माहिती नाही परंतु ही छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त किल्ले स्वराज्यात असावे म्हणून एक एक किल्ला जिंकून घ्यायला सुरुवात केली होती. किल्ले स्वराज्यात असणे किती महत्त्वाचे होते हे शिवराय जाणून होते. शिवरायांकडे मावळ्यांची संख्या कमी होती त्याचबरोबर शस्त्रही कमी होती. त्याउलट शत्रूकडे मोठा फौज फाटा असे, शस्त्रांची संख्याही जास्त असे म्हणून काही किल्ले जिंकायला शिवरायांना अडचण येत होती.
अनेक प्रयत्न करूनही मोठे मोठे किल्ले शिवरायांच्या ताब्यात येत नव्हते म्हणून शिवराय विचार करू लागले कशाप्रकारे आपण मोठे मोठे किल्ले काबीज करू शकतो किंवा ते आपल्या ताब्यात येऊ शकतात याचा विचार शिवराय करू लागले. स्वराज्यासाठी मोठे मोठे किल्ले आपल्या ताब्यात असणे खूप गरजेचे होते. असेच एका मोहिमेवरून परत येत असताना शिवराय आणि त्यांचे मावळे एका जंगलातून प्रवास करत होते. अंधार पडायला लागला होता म्हणून शिवरायांनी मावळ्यांना सुरक्षित जागा शोधण्याचे आदेश दिले.
त्या जंगलात मावळ्यांना एक छोटीशी झोपडी दिसली शिवराय आणि मावळे त्या झोपडीजवळ गेले त्या झोपडी मध्ये कोणी आहे का अशी विचारणा केली असता एक म्हातारी आजी बाहेर आली आणि तिने या सर्वांना आत मध्ये येण्याची विनंती केली. आजीने शिवरायांना ओळखले नाही. आजीने तुम्ही कोण ? असा प्रश्न केला. शिवरायांनीही आपली ओळख न सांगता आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत एका मोहिमेवरून परत चाललो आहोत असे सांगितले. म्हातारीने सर्व मावळ्यांसाठी जेवणासाठी गरम गरम वरणभात केला होता तो वरणभात तिने सर्वांना वाढला.
भात खाण्यासाठी शिवाजी महाराजांनी जसा भातामध्ये हात घातला तसा तो भाजला. आजी हसली आणि म्हणाली बाळा भात खाताना असा मध्ये हात घालायचा नसतो तो भात बाजू बाजूने थोडा थोडा खायचा असतो एकदम खाण्याचा प्रयत्न करशील तर तो भाजणारच ना. शिवराय जशी चूक करत आहेत तशी चूक तुम्ही मावळेही करीत आहात असे आजी म्हणाली. आजीला माहिती नव्हते भात खाणारे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांनी उत्सुकतेने आजीला विचारले आजी आमचे शिवराय कोणती चूक करत आहेत आम्हाला सांगताल का ?
आजी म्हणाली शिवरायांचेच बघ ना बाळा शिवरायांनी अगोदर आजूबाजूचे छोटे छोटे किल्ले जिंकायचे सोडून एकदमच मोठ्या मोठ्या किल्ल्यांमध्ये हात घालत आहेत तर मग त्यांचाही हात तिथे भाजणारच ना ? शिवरायांना आजीचे म्हणणे लक्षात आले आणि त्यांनी तसेच केले त्यांनी अगोदर स्वराज्यातील छोटे-छोटे किल्ले जिंकून घेतले त्या किल्ल्यांमधील जे काही धन मिळाले त्या धनाचा उपयोग किल्ले बळकटीकरणासाठी केला त्या किल्ल्यांमधून शिवरायांना अनेक शस्त्रही मिळाली आणि याचा उपयोग शिवरायांना मोठे मोठे किल्ले जिंकून घेण्यासाठी झाला आणि महाराजांनी जवळपास महाराष्ट्रातील सर्वच किल्ले जिंकून घेतले आणि स्वराज्य स्थापन केले.
Very good story…