रामपूर या गावांमध्ये सागर नावाचा मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. सागर अभ्यासामध्ये जेमतेम होता तो शाळेत नियमितपणे जात नव्हता नियमितपणे अभ्यासही करत नसे. शाळेतील शिक्षकांची ओरड कायम सागरच्या वडिलांच्या कानावर येत असे सागरच्या वडिलांची परिस्थिती खूपच गरिबीची होती. सागरचे वडील शेती करायचे ते सागरला नेहमी सांगत की आमच्यासारखा अडाणी राहू नकोस शिक आणि खूप मोठा हो. परंतु सागरला मित्रांची संगत चांगली नव्हती तो घरून शाळेत पुस्तके आणायचे आहेत वह्या आणायच्या आहेत यासाठी घरून पैसे घ्यायचा आणि बाहेर मित्रांमध्ये जाऊन खर्च करायचा.
सागरच्या वडिलांना त्याच्या या गोष्टींचा खूप राग यायचा कारण ते खूपच गरिबीत दिवस काढत होते त्यांच्या अंगावर कायम फाटलेले कपडे असायचे पायामध्ये फाटलेल्या चपला असायच्या परंतु आपल्या मुलाने काहीतरी करून दाखवावे ही त्यांची अपेक्षा होती. सागरला या गोष्टीची काही घेणे देणे नव्हते तो आपले दिवस मजेत घालवत होता.
एक दिवस सागरच्या शर्ट वर डाग पडला म्हणून नवीन शर्ट घ्यायचा असा हट्ट त्याने आपल्या वडिलांनजवळ धरला तो वडिलांजवळ नवीन शर्ट घेण्यासाठी पैसे मागू लागला त्याच्या वडिलांनी शेतावर काम करून जे पैसे गोळा केले होते ते सागरला दिले. त्यांना माहिती होते सागरला पैसे दिले तरीही तो ते पैसे घेऊन आपल्या मित्रांमध्ये खर्च करणार आहे तरी त्यांनी त्याला पैसे दिले.
त्या रात्री सागर उशिरा घरी आला बाबा त्याची वाटच पाहत होते बाबांनी विचारले कुठे आहे शर्ट सागर म्हणाला नाही आणला. बाबा म्हणाले पैसे कुठे आहेत ? सागर म्हणाला ते माझ्याकडून खर्च झाले. आता मात्र सागरच्या वडिलांच्या राग अनावर झाला आणि त्यांनी सागरला खूप मारले. त्या रात्री सागर काहीही न खाता पिता झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सागरचे वडील शेतावर जाण्यासाठी निघाले त्यांनी जसा घराचा दरवाजा उघडला आणि पाहतात तर काय बाहेर एक नवीन चप्पल ठेवली होती. बाबांनी विचारले ही चप्पल कुणाची आहे ? सागर म्हणाला बाबा ही चप्पल तुमचीच आहे तुम्ही मला काल नवीन शर्ट घेण्यासाठी जे पैसे दिले होते त्या पैशातून मी तुमच्यासाठी नवीन चप्पल आणली काल शेतावर जाताना तुमच्या पायात काटा घुसला होता तुमच्या पायातून रक्त येत होते ते मी पाहिले मला खूप वाईट वाटले, मी माझ्यासाठी नवीन शर्ट न घेता तुमच्यासाठी चप्पल आणली आणि तरी तुम्ही मला मारले माझ्याशी बोलू नका. ते ऐकून सागरच्या वडिलांच्या डोळ्यातून पाणी आले त्यांना काय बोलावे हे सुचेना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सागरला मिठी मारली आणि म्हणाले मला माफ कर बाळा…
वडिलांच्या मिठीत जाऊन सागरही रडू लागला सागर म्हणाला बाबा तुम्ही माफी का मागता माफी तर मीच मागितली पाहिजे तुमची मीच कितीतरी चुका केल्या आहेत मीच आतापर्यंत तुम्ही दिलेले पैसे बाहेर खर्च केले आहेत परंतु बाबा यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीही होणार नाही मला माफ करा. दोघेही थोडा वेळ एकमेकांच्या गळ्यात पडून रडले.
सागरने आपल्या गरिबीची जाणीव ठेवली आणि शिकून तो खूप मोठा अधिकारी झाला. आजही त्याचे वडील अभिमानाने सांगतात माझा मुलगा कलेक्टर आहे…