एक राजा होता. त्याचा देवावर फारसा विश्वास नव्हता. मात्र राजाच्या मंत्र्याचा देवाच्या देवत्वावर दृढ विश्वास होता. तो मंत्री नेहमी म्हणायचा, ” काही झाले तरी नाउमेद होऊ नका. कारण देव चांगले तेच करतो. तो कधीही चूक करत नाही.”
एक दिवस राजा मंत्र्याला बरोबर घेऊन जंगलात शिकारीला गेला. अचानक एका वाघाने राजावर हल्ला केला. मंत्राने चतुराईने तो हल्ला स्वतःवर घेतला आणि त्या वाघाला ठार केले; परंतु त्या हल्ल्यामध्ये राजाला आपल्या हाताचे एक बोट गमवावे लागले, त्यामुळे राजा संतापला आणि त्याने विचारले, ” आहे का तुझा देव दयाळू? देव असता तर माझ्यावर वाघाने हल्ला कसा केला असता ? आणि माझ्या हाताचे बोट मला गमवावी लागले नसते.”
मंत्री म्हणाला, “महाराज, तरीसुद्धा मी आपल्याला ठामपणे सांगतो की, देवाकडून काहीतरी चांगले करण्याचे हेतूने हे घडविले गेले असणार.” मंत्र्याचे हे उत्तर ऐकून राजा जास्तच रागावला आणि त्याने मंत्र्याला कैदेत टाकण्याचा हुकूम दिला.
त्यानंतर राजा परत एकदा शिकारीसाठी जंगलात गेला. यावेळी राजा आदिवासी जमातीच्या तावडीत सापडला. राजाला त्यांनी त्यांच्या देवाला बळी देण्याचे ठरविले. वाजत गाजत त्याला बळी देण्याच्या ठिकाणी आणले, परंतु राजाच्या एका हाताला एक बोट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा मनुष्य परिपूर्ण नाही त्यामुळे देवाला अर्पण करता येणार नाही या कारणासाठी त्यांनी राजाला बळी देण्याचे रद्द केले व राजाला सोडून दिले.
राजवाड्यात परत आल्यावर राजाने त्या मंत्र्याला कैदेतून मुक्त करण्याची आज्ञा दिली. राजा त्याला म्हणाला,”देव खरोखरच माझ्या बाबतीत दयाळू आहे. म्हणून त्याने मला वाचविले. पण मला सांग, देवाने मला तुला बंदीवान करण्याची बुद्धी का दिली?” ते ऐकून मंत्री म्हणाला, “महाराज, मी कैदेत नसतो तर तुमच्या बरोबर परत जंगलात आलो असतो आणि माझी हाताची सर्व बोटे चांगले असल्यामुळे तर त्यांनी माझा बळी दिला असता.” यावर राजा स्मित हास्य करत निघून गेला.
तात्पर्य :- जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं.