मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण धावपळ करीत आहे. ही धावपळ फक्त सुख शोधण्यासाठी… पण ही धावपळ करूनसुद्धा प्रत्येकजण सुखी आहे का ? आपल्या आजच्या बोधकथेतील राजा सुद्धा सुखाच्या शोधात आहे बघुया त्याला सुख मिळते की नाही…
चंद्रपूर नावाचं राज्य होतं. भीमसेन हा त्या राज्याचा वैभवसंपन्न राजा होता. त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, तरीही तो नेहमी आजारी पडत असे . सततच्या आजारपणामुळे तो नेहमी काळजीतच असे.
अनेक वैद्यबुवांनी त्यांचा इलाज केला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. राजाचे आजारपण वाढतच गेले. राज्यातील सर्व प्रजेला ही गोष्ट समजली. तेव्हा एक जुना जाणता वयस्कर मनुष्य राजाकडे आला आणि राजाचे निरीक्षण करून म्हणाला ,” महाराज, तुम्ही एखाद्या सुखी माणसाचा शर्ट घालून पहा, तुम्ही नक्कीच बरे व्हाल. “
त्या वृद्ध माणसाचा सल्ला ऐकून राजाने विचार केला, ” इतके इलाज केले आहेत, आता आणखी एक इलाज करून पाहू या “
राजाने आपल्या सेवकांना सांगून सुखी माणसाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणताही पूर्णपणे सुखी असलेला मनुष्य आढळून आला नाही. राज्यातील प्रजेला कोणते ना कोणते तरी दुःख होतेच. आता राजा वेष बदलून स्वतः सुखी माणसाच्या शोधासाठी बाहेर पडला.
फिरत -फिरत तो एका शेतकऱ्याच्या शेताजवळ पोहोचला. भर उन्हात तो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करत होता. राजाने त्याला विचारले, “काय दादा, तुम्ही सुखी आहात?”
ते राजाचे वाक्य ऐकून त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात चमक आली, त्याच्या तोंडावर स्मित हास्य उमटले. तो म्हणाला, ” परमेश्वराच्या कृपेने मला कोणतेही दुःख नाही.”हे ऐकून राजाला खूप आनंद झाला. कारण त्याला सुखी माणूस सापडला होता. राजाने त्या शेतकऱ्याला त्याचा शर्ट मागण्यासाठी त्याच्या शरीराकडे पाहिले. तर त्याला दिसले की, शेतकऱ्याने नुसते धोतर घातले होते. त्याच्या अंगात शर्ट नव्हताच आणि मेहनतीमुळे त्याचे सर्व शरीर घामाने भिजन गेले होते.
राजाला समजून चुकले, मेहनत हाच त्याचा खरा शर्ट होता तर ! कष्ट केल्यानेच हा खऱ्या अर्थाने सुखी आहे. त्या मनुष्याला शर्ट न मागताच राजा परतला. आता त्यानेही आळस – आराम सोडून व्यायाम व परिश्रम करण्याचा संकल्प केला आणि थोड्याच दिवसात त्याचे आजारपण दूर झाले
तात्पर्य :- परिश्रम हाच सुखाकडे जाण्याचा राजमार्ग आहे.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.