छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्व होते हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत सुद्धा आहेत. आपल्या प्रजेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेत असे तसेच कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही याकडेही शिवरायांचे लक्ष असे.
छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया केल्या त्यातील काही लढाया महाराष्ट्रामध्ये तर काही लढाया महाराष्ट्र बाहेरही केल्या. ही कथा महाराष्ट्र बाहेर झालेल्या एका लढाईची आहे जी लढाई झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची बहीण सावित्री यांच्यामध्ये.
अनेकांना इतिहासातील या कथेबद्दल माहिती असेल तर अनेकांना या कथेबद्दल काहीच माहिती नाही तर वाचूया ही कथा.
कर्नाटक राज्यात बेलवडी नावाचे गाव आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेची मोहीम पूर्ण करून परत येत होते तेव्हा बेलवडी या गावात एक देसाईगढी आहे ही देसाईगढी मावळ्यांना जिंकून घ्यायची होती. मावळ्यांनी जवळजवळ पंधरा दिवस लढाई केली तरीही देसाईगढी काही हाती येईना. साधारणता एक महिन्यानंतर मावळ्यांचा विजय झाला आणि देसाईगढी ताब्यात आली.
या देसाईगढी मध्ये असे कोण होते जे एखाद्या झुंजार योद्धा प्रमाणे शिवरायांच्या मावळ्यांना टक्कर देत होते आणि एवढी छोटीशी देसाईगढी जिंकायला मावळ्यांना एक महिना लागला असा कोण वीर योद्धा होता त्याच्यामध्ये… तर ती होती सावित्री देसाई. तिलाच मल्लम्मा प्रभू देसाई असेही म्हटले जाई. तिने मावळ्यांना एक महिनाभर चिवट झुंज दिली होती आणि सहजासहजी जिंकू दिले नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराज त्या गढीमध्ये गादीवर बसले आणि सावित्री देसाईला दरबारात हजर करण्यात आले. सावित्री घाबरलेली होती आता काय करायचे हे तुला सुचत नव्हते कारण तिच्यासोबत तिचे छोटे बाळही होते. समोरच्या राजाने आपल्याला हरवले आहे म्हटल्यानंतर तो राजा आता आपल्याला आणि आपल्या बाळाला मारून टाकणार हे नक्की होते.
सावित्रीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा ओघळत होत्या. सावित्रीने छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले आणि रडता रडता हात जोडून महाराजांना विनवणी करू लागली ती म्हणाली महाराज मला मारायचे तर मारून टाका परंतु माझ्या बाळाला काहीही करू नका ते अजून खूप छोटे आहे आणि मोठ्या मोठ्याने रडू लागली. महाराजांनी त्या बाळाला आणण्याची आज्ञा दिली. आता मात्र सावित्री खूपच घाबरली तिला असं वाटले आता महाराज बाळाला आणि मला दोघांनाही मारून टाकणार.
बाळाला आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि सावित्रीकडे पाहून म्हणाले ताई… सावित्री म्हणाली तुम्ही मला ताई म्हणत आहात ? महाराज म्हणाले हो मी तुलाच ताई म्हणत आहे. परस्त्रियांना आम्ही मातेसमान आणि बहिणी समान वागणूक देतो आणि आता तर मी तुला ताई म्हणालो आहे असे म्हटल्यानंतर तू माझी बहीण झालीस आणि हे बाळ माझा भाचा. मग आता तूच सांग मी माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्याला मारेन का ??
छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ताई माझ्या मावळ्यांना माहिती नव्हते की या गढी मध्ये एक स्त्री आणि तिचे छोटेसे बाळ कारभार सांभाळत आहे. जर त्यांना ही माहिती असते तर माझ्या मावळ्यांनी कधीही या गढीवर हल्ला केला नसता. मी ही जिंकलेली गडी या बाळाच्या दूध भातासाठी देत आहे आणि आजूबाजूचा सर्व प्रदेश तुझ्या चोळी आणि बांगडी साठी तुला पुन्हा परत करत आहे. तुझ्या भावाकडून तुलाही छोटीशी भेट आहे असे समज. आणि सावित्रीच्या सर्व प्रदेश परत करून महाराज आणि मावळे तिथून निघून गेले.
महाराज तिथून निघून गेल्यानंतर सावित्रीने त्या ठिकाणी एक शिल्प उभारले तर शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या गादीवर बसले आहेत त्यांच्या मांडीवर एक बाळ आहे त्यांच्या एका हातात दुधाची वाटी आणि एका हातात चमचा आहे आणि ते त्या बाळाला दूध पाजत आहेत आणि बाळाची आई त्यांच्याकडे कौतुकाने पाहत आहे असे शिल्प आहे ते. हे शिल्प आजही कर्नाटकातील बेलवडी या गावात पाहायला मिळते.
हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्री या भावा बहिणींच्या प्रेमाची साक्ष देत आहे.
किती महान होता माझा राजा किती महान होते माझ्या राजाचे विचार फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर पर राज्यातील स्त्रिया सुद्धा शिवरायांचा आदर करत होत्या. अशा या महान राजाच्या पावन भूमीत मी जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मी संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणार…
– विकास भारत कोटकर
चला तर आपण सर्वजण मिळून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण जगापर्यंत पोहचवुया.
छत्रपती शिवाजी महाराजांची ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच पुढे शेअर करा.