मित्रांनो गंमत करण्याची सवय प्रत्येकाला असते. तुम्हीही कधी ना कधी कुणाची गंमत केलीच असेल. इतरांची गंमत केल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होते तर कधी कधी गंमत केल्याने भांडणही होते. आजच्या बोधकथेतून आपण पाहणार आहोत की कधी कधी गंमत करने किती महागात पडू शकते.
एका जंगलामध्ये कोल्हा आणि बगळा राहत होते. दोघेही चांगले मित्र होते. एक दिवस कोल्ह्याने बगळ्याला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. कोल्ह्याने खूप सूप बनवले. जेव्हा बगळा जेवणासाठी कोल्हाकडे गेला तेव्हा कोल्ह्याला बगळ्याची थोडीशी गंमत करावीशी वाटली. त्याने ते सूप एका सपाट ताटामध्ये बगळ्याला प्यायला दिले. कोल्ह्याला आपल्या ताटामध्ये सूप आरामात पिता आले. बिचारा बगळा कोल्ह्याच्या तोंडाकडे पहात राहिला. कारण त्याची चोच लांब आणि पातळ होती. त्यामुळे त्याला ताटातले सूप पिता येत नव्हते. त्यादिवशी बगळ्याला उपाशीच रहावे लागले. बगळ्याला खूप राग आला होता. परंतु तो काही बोलला नाही. त्याने मनाशी ठरविले की, एक दिवस कोल्ह्याला चांगली अद्दल घडवायची.
एक दिवस बगळ्याने सुद्धा कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलाविले. जेव्हा कोल्हा बगळ्याच्या घरी गेला तेव्हा त्याच्या घरातून जेवणाचा खूप छान सुगंध येत होता. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. बगळ्याने जेवण ताटात वाढण्याऐवजी एका लांब तोंडाच्या सुरईत वाढले. दोघेही जेवण करण्यासाठी बसले. बगळ्याने सहज जेवण केले. परंतु कोल्ह्याला ते खाता आले नाही. तोही आज उपाशीच राहिला होता. कारण बगळ्याने वाढलेल्या भांड्यामध्ये कोल्ह्याची जीभ जात नव्हती. शेवटी तो उपाशीच आपल्या घरी निघून गेला. कोल्ह्याने विचार केला की आपण जर बगळ्याची गंमत केली नसती तर आज आपल्याला उपाशी राहावे लागले नसते….
तात्पर्य : आपण जसे कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते…
आजची बोधकथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की पुढे शेअर करा.
Such a amazing story.very much valueble for me
Nkkich…jade karm ..vasee phal milta hi hiee