मित्रांनो बरेच लोक असे असतात की आपण जसे आहोत तसे ठीक आहोत परंतु लोक आपल्या क्षमता कधी ओळखतच नाहीत किंवा आपल्या क्षमतांवर त्यांचा विश्वास नसतो. ज्या लोकांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते ते लोक आपल्या जीवनामध्ये खूप काही करून जातात.
एका नदीकाठी एक बदक राहत होते. एके दिवशी त्याने पाच पिलांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू बाकीच्या पिल्लांसारखे नव्हते. ते कुरूप होते. लवकरच त्या पिलालाही कळाले की आपण कुरूप आहोत. बाकीचे चार पिल्ले ही त्या कुरूप पिलाला चिडवत असे. त्यामुळे एक दिवस ते पिल्लू घर सोडून निघून गेले. परंतु त्याचे घर सोडून जगणे एवढे सोपे नव्हते.
काळ बदलत गेला. खराब हवामान आणि शिकारी यांच्यापासून त्याला बचाव करावा लागत होता. कधी कधी तर त्याला उपाशी राहावे लागत असे. एकदा फिरत असताना त्याला एक छोटेसे घर दिसले. ते पिल्लू खूप थकलेले होते त्यामुळे ते त्या घराच्या दारात झोपून गेले. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्यांनी पाहिले की, आपण एका चटईवर झोपलेलो आहोत. त्याच्यासमोर जेवण ठेवलेले होते. त्या घराच्या मालकाने त्याला आपल्या जवळ ठेवून घेतले. ते पिल्लू घराच्या मालकासोबत राहू लागले. पुढे काळ बदलत गेला आणि परिस्थिती ही बदलत गेली.
एके दिवशी फिरत असताना ते बदकाचे पिल्लू पुन्हा नदीकाठी परत गेले. जेव्हा ते बदकाचे पिल्लू पाणी पिण्यासाठी पाण्यात वाकले तेव्हा त्याला एक सुंदर पक्षाची प्रतिमा दिसली. त्याला वाटले दुसराच एखाद्या पक्षी आहे. तो परत पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकला तेव्हा त्याला तीच प्रतिमा पुन्हा दिसली. त्यावर त्याचा विश्वास बसेना. कारण ती प्रतिमा हंस पक्षाची होती. आता त्या कुरूप बदकाचे रूपांतर सुंदर हंस पक्षात झाले होते. त्याचवेळी आकाशातून हंस पक्षांचा थवा उडत होता. तेव्हा त्या पिलाला कळाले की आपणही आकाशात उडू शकतो. त्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली शेवटी तो त्या हंस पक्षांप्रमाणे आकाशात उडून गेला.
*तात्पर्य :- प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त कलागुण असतात फक्त त्याची ओळख होणे खूप महत्त्वाचे आहे. एकदा की आपण आपले सुप्त गुण ओळखले आणि आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली की आपणही आपल्या जीवनामध्ये खूप काही करून जातो.
मित्रांनो आजची बोधकथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच पुढे शेअर करा भेटूया पुढच्या बोधकथेसह…