मित्रांनो आपण सर्वजण नियमितपणे पैसे खर्च करत असतो कोणी पैसे स्वतः कमावून खर्च करतात तर कोणी आपल्या आई-वडिलांकडून घेऊन पैसे खर्च करतात. परंतु पैशांची खरी किंमत काय असते हे आपण आजच्या बोधकथेतून पाहणार आहोत.
खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एक सरेपटी नावाचे गाव होते. त्या गावात एका मुलाने खूप चांगल्या कुटुंबांमध्ये जन्म घेतला. त्या मुलाचे आई वडील त्याची खूप चांगली काळजी घेत असे. तो मागेल ती वस्तू त्याला मिळत असे. परंतु मोठा झाल्यानंतर मुलगा बिघडला. कोणत्याच वस्तूंची त्याला किंमत नव्हती. त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यात काही फरक पडला नाही. तो आपल्या वडिलांनी कमावलेले पैसे खर्च करत होता. एक दिवस वडिलांनी त्याला बोलावले आणि म्हणाले,,”तू माझ्या कष्टाच्या कमाईतले पैसे आतापर्यंत खूप खर्च केले. आता जर तुला माझे पैसे हवे असतील तर तुला स्वतःला सिद्ध कराव लागेल.”
हे ऐकून मुलाने वडिलांचे म्हणणे ऐकले आणि काहीतरी काम करण्याचा मनाशी निश्चय केला. त्याला एक खूप कठीण काम भेटले. धान्याची पोती पाठीवर उचलून गोदामात ठेवायची होती आणि दिवसाच्या शेवटी त्याला फक्त 50 रुपये मिळत असे. ते मिळालेले पैसे तो आपल्या वडिलांच्या हातात आणून द्यायचा आणि त्याचे वडील ते पन्नास रुपये विहिरीत फेकून देत असे. असे तीन ते चार दिवस चालले. मग शेवटी तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला,”मी दिवसभर कष्ट करतो आणि तुम्ही माझी कष्टाची कमाई विहिरीत का फेकता?”
हे ऐकून त्याचे वडील हसले आणि म्हणाले,”बाळा, आता तुला माहित झाले असेल की एवढ्या वर्षांपासून मला कसे वाटत असेल, जेव्हा मी कष्टाने कमावलेले पैसे तू व्यर्थ खर्च करत होता.” हे वाक्य ऐकून मुलाला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्यांनी परत कधीही पैसे चुकीच्या पद्धतीने खर्च केले नाही.
मेहनत करून आणि कष्ट करून तो मुलगा पुढे खूप श्रीमंत झाला.
तात्पर्य:- पैशाची किंमत तेव्हा माहीत होते ,जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमावता.