रामपूर या छोट्याशा खेड्यामध्ये गणपत राहत होता. त्याला दोन मुले होती. एक सतत दुःखात राहायचा, त्याला काही दिले तरी तो निराशच असायचा. तर दुसरा सतत आनंदात असायचा, नाचत – गात असायचा. गणपतला दोन्हीही मुलांचे काळजी वाटायची. पहिल्या मुलाला आयुष्यात आनंद आहे हे समजावं असं त्याला वाटायचं, तर दुसऱ्या मुलाला आयुष्याची दुःखी बाजू ही समजावी व कधी त्रास झाला तर त्याने खचून जाऊ नये असं त्याला वाटायचे.
एकदा त्याने ठरवले की दोन्ही मुलांना वेगवेगळ्या खोल्यामध्ये कोंडून ठेवायचे. जो सतत उदास चेहऱ्याने बसायचा त्याला सुंदर सजवलेली खोली दिली. त्या खोलीत खूप सुख सोयी होत्या. तर जो मुलगा सतत आनंदात नाचत असायचा त्याच्या खोलीत कोणत्याच सोयी नव्हत्या. वाळलेले गवत त्या खोलीत पडलेले होते. अगदी साधे जेवण होते. त्या दोन्ही खोल्यांमध्ये एक – एक आरसा होता.
खूप वेळाने गणपत ने पहिल्या खोलीचे दार उघडले. त्याचा उदास राहणारा मुलगा जास्तच उदास दिसत होता. तो खूप रडत होता. गणपत ने त्याला विचारले की, ” का रे बाबा तू का रडत आहेस? तू का दुखी?” तो म्हणाला, “मी विचार करत होतो की, आज तर मला चांगलं जेवण आहे, राहण्यासाठी चांगली खोली आहे. पण यातून बाहेर आलो की परत रोजच आयुष्य जगायचं. म्हणून मी या सुखाकडे पाहून रडत होतो.
गणपत ने दुसऱ्या मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला. तो दिलेले जेवण संपवून सुक्या गवतावर आडवा पडून एक छान गाणं गात आनंदाने हसत होता. गणपत ने त्याला विचारलं, “का रे बाबा तू का आनंदाने हसतोय?” तो म्हणाला,” मी सुक्या रोट्या खाल्ल्या; त्या खाताना मला खूपच वेडे वाकड तोंड करावे लागत होतं. समोरच्या आरशात ते मला दिसत होतं. त्याकडे बघून मी हसत होतो. नंतर विचार करत होतो की इथून बाहेर पडलो तर बाहेर किती मोकळा वारा असेल! पक्षी गाणं गात असतील! ते आठवून मी हसत होतो.”
गणपत म्हणाला, “सुख हे मानण्यावर आहे आणि हे मानणं आपल्या वृत्तीवर आहे. हे ज्याला समजलं त्याला निसर्गाच्या प्रत्येक कृतीतून आनंदच मिळतो.”
तात्पर्य – खरा आनंद आपल्या मनामध्येच असतो.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.